Tuesday, June 26, 2012

मेधाताई

         मी पहिली-दुसरीत असेन तेव्हा. काय माहित,सूर्याचं आणि माझं काय वाकड होत! कधी लवकर उठायचेच नाही.दुपारची शाळा असल्याचा परिणाम! मला उठवण्यासाठी आई वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायची.
बाबापुता करून उठवायची.
          एक दिवस असेच झोपले होते. सकाळची 10-10:30 ची वेळ असेल. अचानक आई मला हाका मारायला लागली, गदागदा हलवून उठवायला लागली. म्हणाली, "खिडकीजवळ चल पटकन. बघ केवढी लोक जात आहेत खालून." मला उठवण्याचा एक प्रयत्न असं समजून मी दुर्लक्ष केलं, पण आई मला ओढतच घेऊन गेली.
          खरचं, रस्त्यावरून एक मोर्चा चाललेला होता. ती माणसं गरीब वाटत होती. कुठल्यातरी गावातून आलेली असावीत. नजरेत एकप्रकारचा बावरलेपणा होता. नऊवारी साडीतल्या बायका, डोक्यावर गाठोडी ठेवून चालत होत्या. सदरा-लेंगा आणि डोक्यावर गांधी टोपी असा पुरूषांचा पोशाख होता. काही बायकांच्या कडेवर त्यांची तान्हुली होती. म्हातारेकोतारे, स्त्री-पुरुष, लहान मुलं, तरुण सगळेच त्या मोर्च्यात सहभागी झाले होते. काही माणसांनी हातात banner पकडले होते. घोषणा देत ते चालले होते, पण कुठेही गोंधळ नव्हता, एक शिस्त होती त्या मोर्च्याला! घोषणा देत असले तरी एक शांतात होती त्या मोर्च्यात!
          तेवढयात एक बाई मागून घोषणा देत आल्या. हातात फलक होता. फिक्कट केशरी रंगाची पाचवारी साडी, अगदी साध्याच होत्या त्या. "अरे यांना तर कुठेतरी पाहिलं आहे" मी आणि आई एकदम उद्गारलो.
कुठे बर? अचानक आईला आठवलं,"अरे या तर मेधा पाटकर!" माझ्या इमारतीखालून चालत गेल्या!!
त्या नजरेआड होईपर्यंत मी त्यांना पाहत होते.
          जास्तीत जास्त एक मिनिट मी त्यांना पाहिलं असेल, पण तो प्रसंग अजूनही नजरेसमोरून जात नाहीये. हेही आठवत नाहीये की, तो मोर्चा कशासाठी होता, ते सगळे कुठून आले होते. पण किमान माझ्यासाठी तरी, हा प्रसंग खूप विशेष आहे.
          कोण,कुठल्यातरी खेड्यातले लोक, त्यांच्या हक्कांसाठी एखादी व्यक्ती आपला स्वार्थ सोडून प्राणपणाने झटते, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल मनात आदर दाटून येतो. मला त्या माणसांच्या चेहऱ्यावारचे भाव आठवत आहेत, विसरूच शकत नाही मी! आणि मेधाताईचा आवेशही आठवतोय. Helicopter ने दुष्काळाची पाहणी करणारे आपले राज्यकर्ते आणि लोकांना संघटीत करून,त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरणाऱ्या मेधाताई यांच्यात फार फरक आहे! hats off to you मेधाताई!


No comments:

Post a Comment